नालेसफाईसाठी 150 कोटींच्या निविदा, मान्सूनपूर्व कामांसाठी पालिका कामाला लागली

या वर्षी पालिका पावसापूर्व नालेसफाईसाठी वेगाने कामाला लागली असून या वर्षी जानेवारीतच निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या वर्षी मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील छोटे-मोठे नाले, मिठी नदीच्या नालेसफाईसाठी 150 कोटींचा खर्च केला जाणार असून यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. यामध्ये नालेसफाईसोबतच नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे केली जाणार आहेत.

नालेसफाईमध्ये पूर्व उपनगरासाठी निविदा काढण्यात आल्या असून मुलुंडमधील लहान नाल्यांच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटी 79 हजार रुपये, कुर्ला प्रीमियर लेन्थ नाला, गौरीशंकर नगर नाला ते रामदेव पीर नाला आदी नाल्यांचे खोलीकरण यासाठी 6 कोटी 41 लाख रुपये, एम पूर्व येथील देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील अहिल्याबाई होळकर मार्ग सर्व्हिस रोड, देवनार नाला रुंदीकरण आणि खोलीकरण यासाठी 10 कोटी 12 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आहेत. तर वांद्रे पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी वांद्रे स्टेशन पश्चिम येथे मस्जिदजवळ कल्व्हर्टचे काम केले जाणार आहे. सांताक्रुझ स्टेशन रोड येथील बॉक्स ड्रेनचे बांधकाम, वांद्रे पूर्व भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी, जोगेश्वरी पूर्व येथील नाल्यांचे बांधकाम, बोरिवली पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी कल्व्हर्टचे काम करण्यात येणार आहे. चारकोप कांदिवली, मालाड मधील पर्जन्य वाहिन्यांचे बांधकाम तसेच कल्व्हर्टची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.  या कामासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.