आमदार अपात्रता प्रकरण – विधानसभा अध्यक्षांची दिल्लीत कायदेतज्ञांशी चर्चा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत आहेत. आमदार अपात्रतेप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने खडसावले होते, त्यानंतर ते गुरुवारी तातडीने दिल्लीला गेले. दिल्लीत नार्वेकर यांनी कायदेतज्ञांशी चर्चा केली असून या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यात येईल.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेप्रकरणी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दिल्लीत कायदेतज्ञांच्या भेटीगाठी झाल्या. अपात्रतेसंदर्भातील जो कायदा आहे तो विकसीत असून त्याच्यात बदल होत राहतात. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार कायद्यात बदल होत राहतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका, कायद्यातील संशोधन किंवा त्याची अंमलबजावणी कोणत्यारितीने योग्य होईल याह अनेक विषयांवरती माझी कायदेतज्ञांशी चर्चा झाली.

राहुल नार्वेकर यांनी पुढील सुनावणीबाबतही भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते. आमची सुनावणी 14 तारखेला झाली आणि पुढील सुनावणी स्केड्यूल होती. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये आम्ही सुनावणी घेऊ आणि प्रक्रियात्मक पैलू असतील त्या संदर्भात निर्ण घेऊ, असे राहुल नार्वेकर म्हणाले. तसेच आवश्यकता भासल्यास दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनाही बोलावले जाईल, असेही नार्वेकर म्हणाले.

अपात्रतेसंदर्भात कारवाईआधी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत यावं लागत असेल तर शंकांना बळ मिळतं! संजय राऊत यांनी फटकारलं

आमदार अपात्रतेचा निर्णय योग्य वेळेत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्यासंदर्भात विचारले असता नार्वेकर म्हणाले, सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. न्यायप्रविष्ठ म्हणजे मी स्वत: या विषयावरती सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने याबाबत अधिक बोलणे उचित राहणार नाही. परंतु संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिलेले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सगळ्यांनी काम करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयानेही संविधानिक शिस्त पाळून योग्यरित्या निर्देश दिलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

गेल्या चार महिन्यांत विधानसभा अध्यक्ष या नात्याने राहुल नार्वेकर यांनी केवळ एकदाच सुनावणी घेतली आणि त्यानंतर पुढची तारीखही दिली नाही याबद्दल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी राहुल नार्वेकर हे गुरुवारी दिल्लीला रवाना झाले. तेथील कायदेतज्ञांशी ते चर्चा करणार असल्याची माहिती मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली होती. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.