
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरमधील शिवाजी पार्क येथे अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना नेते, खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह मुंबईतील विविध मराठी दैनिकांच्या संपादकांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून हे प्रदर्शन 1 मार्चपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनास गिरीश कुबेर, राजीव खांडेकर, साहिल जोशी, कमलेश सुतार, अतुल कुलकर्णी, मंदार फणसे, आशीष जाधव, विवेक गिरधारी, उमेश कुमावत, रवींद्र आंबेकर, प्रशांत कदम, नीलेश खरे, प्रकाश सावंत, संजय सावंत, उदय तानपाठक, विशाल पाटील, वृषाली कदम, जितेंद्र दीक्षित, राहुल गडपाले आदी उपस्थित होते. उद्घाटनंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यासह पुस्तके न्याहाळली आणि या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रदर्शनात वाचकांच्या पसंतीस उतरलेली आणि विविध भाषांत अनुवादित झालेली हजारो मराठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. पहिल्याच दिवशी शेकडो वाचनप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली.
अभंग रीपोस्टची आज धमाल
पुस्तक प्रदर्शनासोबतच मनसेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता शिवाजी पार्क येथे ‘रंग भक्तीचा – नाद विठ्ठलाचा’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीत ‘अभंग रीपोस्ट’ हा ग्रुप त्यांचा ‘चल गं सखे पंढरीला’ हा लोकप्रिय कार्यक्रम सादर करणार आहेत.






























































