
अमेरिका, इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणचे ब्रह्मास्त्र ठरलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीलाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांच्या आदेशावरून अमेरिकेच्या नौदलाने होर्मुझला घेरले आहे. इराणच्या बंदरावरून येणारे किंवा तिथे जाणारे एकही जहाज सोडले जाणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा मोठय़ा तेलसंकटात अडकणार आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीला लागून असलेल्या पर्शियन, ओमान आणि अरबी समुद्राची अमेरिकेने नाकेबंदी केली आहे. इराणचे तेल किंवा वायू घेणारे कुठलेही जहाज या नाकेबंदीतून सोडणार नाही. ही नाकेबंदी मोडून काढण्याचा प्रयत्न इराणी जहाजांनी केल्यास त्यावर हल्ले केले जातील, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.
कच्च्या तेलाचे भाव पुन्हा शंभरी पार
इराणने आधीच होर्मुझमधून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांची कोणतीही जहाजे येथून सोडली जात नाहीत. त्यातच आता अमेरिकेने इराणशी व्यापार करणारी जहाजे रोखून धरण्याचा वा जप्त करण्याचा इशारा दिला आहे. त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला. कच्च्या तेलाचे दर आज प्रति बॅरलमागे 104 डॉलरवर पोहोचले.
एकही बंदर शिल्लक राहणार नाही इराणची धमकी
इराणच्या बंदरावरील व्यापार ठप्प झाल्यास आखातातील एकही बंदर सुरक्षित शिल्लक राहणार नाही, अशी थेट धमकी इराणने दिली आहे. होर्मुझची नाकेबंदी करण्याचा निर्णय हा ट्रम्प गोंधळल्याचे लक्षण आहे. त्यांच्याकडे कुठलीही ठोस रणनीती उरलेली नाही. त्यांची ही कृती सरळसरळ चाचेगिरी आहे. अमेरिकेची कोणतीही युद्धनौका होर्मुझच्या जवळपासही दिसल्यास ते युद्धबंदीचे उल्लंघन समजले जाईल आणि प्रतिहल्ला केला जाईल, असे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने ठणकावले आहे.
























































