
मुंबईसह महाराष्ट्रात वाढणाऱया तापमानाला सरकारकडे एकच उपाय आहे तो म्हणजे ‘झाडे तोडा आणि कंत्राटदार-बिल्डरांना ठिकठिकाणी काँक्रिट ओतण्यास परवानगी द्या!’ असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला आहे.
तापमानवाढीमुळे नागरिक हैराण असताना सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बोरिवलीत आज दुपारी 2.45 वाजता 39.3 अंश सेल्सिअस, सांताक्रुझ 40 अंश सेल्सिअस, नवी मुंबई 44.1 अंश सेल्सिअस आणि ठाण्यात 48.6 अंश सेल्सिअस तापमान असल्यासारखी स्थिती असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
महाराष्ट्र तापला
अकोल्यात सोमवारी या वर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ कायम असून आज या ठिकाणी पारा 43.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे संचारबंदीसदृश परिस्थिती रस्त्यावर निर्माण झाली आहे.
























































