
अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका 15 वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या 8 पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली असून, यामुळे आरोपींविरोधात पुराव्यांची साखळी अधिक भक्कम झाली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने काही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडीओ काढले होते. या प्रकरणातील इतर सात पीडित मुलींची ओळख पटली असली तरी, बदनामीच्या भीतीने त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. मात्र, नागपूरच्या या पीडितेने पुढाकार घेतल्यामुळे पोलिसांसमोर असलेली सर्वात मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. आता पीडितेच्या थेट जबाबामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पीडितेने शनिवारी नागपूर ते परतवाडा, अमरावती असा तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले. यवतमाळच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील महिला पथकाने तिचा जबाब नोंदवून घेतला.
कायद्याचा फास होणार घट्ट
पोलिसांनी सुरुवातीला हा गुन्हा स्वतःहून दाखल केला होता, जो केवळ गोपनीय सूत्रांच्या माहितीवर आधारित होता. मात्र, आता पीडितेचा प्रत्यक्ष जबाब मिळाल्यामुळे पोलीस एफआयआरमध्ये पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अधिक कडक कलमांचा समावेश करणार आहेत.


























































