
गेल्या कित्येक दिवसांपासून फेमिना मिस इंडिया या स्पर्धेची चर्चा रंगली होती. अखेर गोव्याची साध्वी सतीश सैल हिला ओडिशाच्या भुवनेश्वर येथे फेमिना मिस इंडिया २०२६ चा किताब प्रदान करण्यात आला आहे. हा किताब जिंकल्यापासून साध्वी सैल सोशल मीडियावर चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजनांदिनी पवारने तिला टक्कर देत ती पहिली उपविजेती बनली. जम्मू – काश्मीरची अद्वैता दुसरी उपविजेती ठरली. सैल आता ७५ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. ओडिशामध्ये ‘मिस फेमिना’चे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते.
शनिवारी रात्री भुवनेश्वर येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात साध्वीने देशभरातील ३० स्पर्धकांमधून हा किताब पटकावला. महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवार ‘फेमिना मिस इंडिया २०२६’ मध्ये प्रथम उपविजेती ठरली. तर जम्मू- कश्मिरची अद्वैता जी. तिसऱ्या क्रमांकावर राहिली. साध्वीने हा विजय अविश्वसनीय असल्याचे म्हटले असून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्याची रहिवासी असलेली मॉडेल आणि उद्योजिका साध्वीने अनेक शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे. त्याचबरोबर ती ‘कॅलिफोर्निया बुरिटो’ सारख्या जाहिरात मोहिमांचा चेहरा राहिली आहे. तिने बांधकाम आणि विकास क्षेत्रात एका कंपनीची सह-स्थापना देखील केली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अभिनेत्री झीनत अमान म्हणाल्या, “मी ‘मिस फेमिना’बद्दल काय बोलू? मी अनेक वर्षांपूर्वी याचा एक भाग होते आणि हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. हे एक असे व्यासपीठ आहे जे मुलींना संधी आणि प्रशिक्षण देते. आपल्या मुली जागतिक स्तरावर किती यशस्वी झाल्या आहेत, त्यांनी किती काही मिळवले आहे, हे तुम्ही पाहू शकता.”


























































