
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राहणाऱ्या प्रतीक रासकर (२८) या तरुणाने अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतल्याची घटना आज पहाटे घडली. शेअर बाजारात काम करणारा प्रतीक जेवायला बाहेर जातो असे सांगून रविवारी रात्री घरातून बाहेर पडला आणि आज पहाटे कार घेऊन थेट अटल सेतूवर पोहोचला. सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवत त्याने समुद्रात उडी मारली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उलवे पोलिसांनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
प्रतीक रासकर हा शेअर बाजारात संबंधित कामे करत होता. रविवारी रात्री तो घरच्यांना बाहेर जेवायला जातो असे सांगून आपल्या चारचाकीतून घराबाहेर पडला. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही. एका तरुणाने अटल सेतूवरून आज सकाळीच समुद्रात उडी घेतल्याची माहिती प्रतीकच्या नातेवाईकांना मिळाली. त्यानुसार नातेवाईकांनी नवी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. प्रतीकचे मेहुणे धीरज जाधव यांनी याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात तक्रार केली. प्रतीक हा एकुलता एक मुलगा असल्याचे मेहुणे धीरज जाधव यांनी सांगितले.
१५ जणांची आत्महत्या
प्रतीकने अटल सेतूवरून उडी मारल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, मच्छीमार आणि सागरी दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रतीकचा समुद्रात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. अटल सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यापासून आतापर्यंत १५ हून अधिक जणांनी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे, अशी माहिती उलवे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय अनिल राजडे करत आहेत.




























































