
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर (एमएमसी) निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड होते. मात्र ती निवडणूक न घेता सरकारकडून सदस्य नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तो मागे घेऊन पूर्वीप्रमाणेच निवडणुकीद्वारेच एमएमसीवर सदस्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने सुनील प्रभू यांना लेखी पत्र देण्यात आले होते. एमएमसी ही सुमारे 18 लाखांहून अधिक डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी वैधानिक स्वायत्त व नियामक संस्था आहे. त्या संस्थेवर सरकारकडून नामनिर्देशन करण्याची पद्धती लागू केल्यास परिषदेचे प्रतिनिधी स्वरूप लयाला जाईल. वैद्यकीय समुदायाप्रती उत्तरदायित्व घटेल. परिषदेची स्वायत्तता व निष्पक्षता बाधित होऊन निर्णय प्रक्रियेबाबत शंका व अविश्वास निर्माण होऊ शकतो, असे दुष्परिणाम या पत्राद्वारे आयएमएने निदर्शनास आणून दिले आहेत. वैद्यक क्षेत्रातील या गंभीर चिंतेची दखल घ्यावी अशी विनंतीही पत्रामध्ये प्रभू यांना करण्यात आली होती.
त्याची दखल घेत सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक हस्तक्षेप करून मंत्रिमंडळाने एमएमसीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करून अधिनियमात बदल करावा, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे.






























































