महागाईविरोधात जनआक्रोश; शिवसैनिकांचे पनवेल तहसील कार्यालयासमोर आंदोलन; सरकारच्या भोंगळ धोरणांचा केला निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारच्या भोंगळ धोरणांचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांचे जगणे नकोसे करत आहे. मात्र त्यानंतरही केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार फक्त राजकारणात मश्गूल असल्याची टीका करत आज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेलमध्ये जोरदार आंदोलन केले. तहसील कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सरकारच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर शेकडो शिवसैनिक, महिला आघाडी व युवा सैनिकांच्या साथीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगरप्रमुख अॅड. समाधान काशिद, गटनेत्या लीना गरड, माजी जिल्हाप्रमुख शिरीष बुटाला, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सूर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी, नगरसेविका प्रगती पाटील, रितिशा गोवारी, प्रिया गोवारी, मेघना घाडगे, आर्या जाधव, उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, संगीता राऊत, उज्ज्वला गावडे, ज्योती मोहिते, मालती पिंगळा, सानिका मोरे, समीक्षा पांगम यांच्यासह शेकडो शिवसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

जनतेला लुटण्याचे काम सरकार करतेय

इंधन दरवाढीसह गॅस दरवाढ करून सरकार सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे, अशी टीका यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी केली. या सरकारचा पापाचा घडा भरत आला असून पुढील काळात महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात परत येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

जनता महागाईने त्रस्त.. सत्ताधारी उमेदवार विकत घेण्यात व्यस्त

सरकारच्या फोडाफोडीच्या राजकारणावर यावेळी जोरदार टीका करण्यात आली. यावेळी बोलताना उपनेते बबन पाटील म्हणाले जनता महागाईने त्रस्त आहे मात्र सत्ताधारी खोके वाटून उमेदवार विकत घेण्यात व्यस्त आहेत. अधिवेशनाच्या काळात बंद करण्यात येणारे लेडीज बार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.