
बैल घ्यायला पैसे नाहीत म्हणून लातूरमधील शेतकऱ्याने पत्नीलाच नांगराला जुंपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर शेतकऱ्याला मदत उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळच्या गोशाळेतून नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच सदर शेतकऱ्याला बैल घेण्यासाठी 32 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड हे आपल्या शेतात मशागतीची कामे करत होते. अचानक वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. याच दरम्यान शेतात वीज कोसळून गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, या अस्मानी संकटामुळे गायकवाड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतीचा मुख्य आधार असलेला जोडीदार गेल्यामुळे ते पूर्णपणे खचले. दुसरा बैल घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अखेर पत्नी औसाबाईला त्यांनी नांगराला जुंपले आणि नांगरणी केली. याचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर तोफ डागली.
भाजप ‘सेलिब्रेशन मोड’मध्ये, पण… दानवेंचा टोला
पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक काळ पदावर राहण्याचा विक्रम करत असताना देशातील भाजप सध्या ‘सेलिब्रेशन मोड’मध्ये आहे. होय, ही तीच भाजप आहे जिने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. हा विक्रम पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला, औसा तालुक्यातील बांबळी गावातील हौसाबाई गायकवाड या बैलाच्या साथीने स्वतः नांगर ओढताना दिसल्या, कारण त्यांचा बैल विजेच्या तडाख्यात मरण पावला. आता 2026 चे निम्मे वर्ष संपत आले, तरीही या शेतकऱ्याकडे दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद उरलेली नाही. या सेलिब्रेशनचाच एक भाग म्हणून का होईना, भाजप नेत्यांनी या महिला शेतकऱ्याला लगोलग एक बैल पोहोचता करायला काय हरकत आहे? अशी पोस्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केली होती.

रोहित पवारांची टीका
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावात काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने नांगराच्या दुसऱ्या बाजूला चक्क पत्नीला जुंपावं लागलं. ही विदारक स्थिती आहे अन्नदात्याची! देशाचं पोट भरावं यासाठी राबणाऱ्या अन्नदात्याच्या कुटुंबाला जनावराची जागा घ्यावी लागत असेल तर हे केवळ दुखःदच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे. स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री महोदयांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला विशेष बाब म्हणून त्वरित मदत मिळवून द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली होती.


































































