
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. मोदींनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 4,398 दिवसांच्या कार्यकाळाला मागे टाकले आहे. त्यामुळे मोदींची तुलना पंडित जवाहरलाल नेहरूसोबत केली जात आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. पंडित नेहरूंपेक्षा मी चार दिवस जास्त जगलो किंवा नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर चार दिवस जास्त खुर्ची उबवली, हा काही मोठा विक्रम असू शकत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील न्यायव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेमधील वाढत्या जवळीकतेवर तीव्र शब्दात टीका केली. देशाच्या इतिहासात कधीही घडली नाही, अशी गंभीर परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे तब्बल 56 न्यायाधीश सध्या लंडनमध्ये सरकारी खर्चाने देशाच्या मंत्र्यांबरोबर पार्ट्या करत असून तिथे बॅडमिंटन खेळत असल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे. या सगळ्या दौऱ्याचा खर्च कोण करतंय आणि राजकारण्यांबरोबर न्यायाधीशांची उठबस का सुरू आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या पार्टीत कदाचित देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तसुद्धा सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवत त्यांनी या संपूर्ण प्रकाराला ‘शेमलेस’ असे संबोधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहण्याचा नवा विक्रम रचत असल्याचे बोलले जात आहे. यावर टोला लगावताना राऊत म्हणाले की, पंडित नेहरूंपेक्षा मी चार दिवस जास्त जगलो किंवा नेहरूंपेक्षा मी प्रधानमंत्री पदावर चार दिवस जास्त खुर्ची उबवली, हा काही मोठा विक्रम असू शकत नाही. या एका गोष्टीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा तुम्ही या संपूर्ण कार्यकाळात देशासाठी नक्की काय केले, ते सांगा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या 12 वर्षांतील मोदी सरकारची कमाई म्हणजेच न्यायाधीशांचे हे लंडन दौरे आणि राजकारण्यांसोबतच्या पार्ट्या आहेत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून नेहमीच अंतर राखले होते, पण आज ते एकाच ताटात जेवण करत आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेची इतकी बकवास अवस्था नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केली आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
न्यायव्यवस्थेच्या या भूमिकेमुळेच विरोधी पक्षांना देशात न्याय मिळत नसल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. लंडन दौऱ्याचे फोटो लवकरच समोर येतील आणि त्यानंतर सर्व सत्य जनतेला समजेल, असे संजय राऊत म्हणाले. आआमची शिवसेना, पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हाती का आणि कसे सोपवले गेले, तसेच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना कसा देण्यात आला, याचे उत्तर लवकरच मिळते, असा दावा त्यांनी केला. ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस, मीनाक्षी नटराजन आणि आमचे म्हणणे न्यायमूर्तींनी का ऐकून घेतले नाही, तसेच एसआयआरमध्ये काय घोटाळे झाले, हे आता स्पष्ट होत आहे. न्यायमूर्तींना लाज वाटली पाहिजे, अशा अत्यंत कठोर शब्दांत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त केला.




























































