
ओमानच्या समुद्रात जहाजांवर हल्ले करून तीन हिंदुस्थानींचा जीव घेणाऱ्या अमेरिकेने माफी मागण्याऐवजी मोदी सरकारलाच दम दिला आहे. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ‘मोदी आज्ञाधारक नोकराप्रमाणे अमेरिकेचे ऐकतात आणि त्यांचे आदेश पाळतात,’ असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.
सात दिवसांत अमेरिकेने हिंदुस्थानच्या तीन जहाजांवर हल्ले केले. तीन खलाशांच्या हत्येबद्दल अमेरिकेने माफी न मागता उलट दादागिरी सुरूच ठेवली. कुठलाही स्वतंत्र देश अशी भाषा कधीच सहन करणार नाही. मात्र, आपले शरणागत पंतप्रधान गप्प आहेत. एका आज्ञाधारक नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, असे राहुल गांधी यांनी नमूद केले.
तडजोड करणारा पंतप्रधान देशाच्या सन्मानाचं संरक्षण करू शकत नाही. कारण, जे लोक आपल्या देशाचा अपमान करत आहेत, त्यांच्याच कंट्रोलमध्ये आपले पंतप्रधान आहेत.



























































