अशा भोसले, पद्मविपुषण आणि दीनदयाल मंगेशकर! राहुल नार्वेकरांनी मराठीचे हाल हाल केले… समाज माध्यमांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अमृतातेही पैजा जिंके’ असा लौकिक असलेल्या मराठी भाषेची महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज भरसभागृहात अक्षरशः लक्तरे काढली. प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाचा अवघ्या पावणेपाच मिनिटांचा शोकप्रस्ताव वाचून दाखवताना नार्वेकर यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 30 पेक्षा जास्त गंभीर चुका केल्या. ज्यांचा शोकप्रस्ताव मांडला त्या आशा भोसले यांचे नावही त्यांना धड वाचता आले नाही. नार्वेकरांनी त्यांचा उल्लेख ‘अशा भोसले’ असा केला. शिवाय, त्यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ मंगशेकर यांच्याऐवजी ‘दीनदयाल मंगेशकर’ असे वाचले, तर देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मविभूषणला ‘पद्मविपुषण’ करून टाकले. नार्वेकरांच्या या ‘अजिबात’ मराठीचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले. राहुल नार्वेकरांनी मराठीचे हाल हाल केले, अशी संतापजनक प्रतिक्रिया सर्वत्र उमटली.

नार्वेकर जसे बोलले तसे

पद्मविपुषण आशा भोसले यांचा जन्म अ् ह्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताच्या वारसा घेऊन जन्मला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी ललाटीचे वैभव आहे. अशा भोसले आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून आठ दशकांहून अधिक काळ रेसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱया अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिमा आणि अलोकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची बासरी वासरी होत्या. तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले धन घनशामाच्या स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मस्तात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्टय़े होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा दुरदमय इच्छाशक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झा झाले, झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या.

कैलासवासी आशा भोसले यांचा सुरांनी अभंगतील ओतत्रोत भक्ती, प्रेमगत गीतातील अनुराग, श्रिंगार, गीतातील मधळाळ, मादकता, विरहत गीतातील दुखरी वेदन वेदना, उडत्या गाण्यातील खटय़ाळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोटयावधी ग एss गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. 1943 मध्ये माझ माझं बाळ या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेल्या आशाताईंच्या संगीत प्रवास तब्बल 12 हजारहून अधिक गाणी गाऊन थांबला. तब्बल 20 भाषांतील गाणी त्यांनी गायली. शास्त्राrय संगीताचा गंभीर्यपूर्वक पाया ढळू न देता त्यांनी सुगम संगीतातील भाव आणि ठसा सहजतेने पेलला. त्यांच्या स्वरात असलेली विदुलता ही विरहत विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे. बालगीतापासून ते पॉपपर्यंत आणि नाट्यगीतापासून ते लावण्यांपर्यंत असे वैविध्यपूर्ण शब्दांचे हृदरूप त्यांनी आपल्या स्वरातून दाखिवले.

कैलासवासी आशा भोसले यांनी भारतीय संगीतक्षेत्रात दिलेली योगदान अतुलनीय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौर गौरवण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यशोचित यथोचित सन्मान केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अशा या असामान्य, महान, अद्वितीय आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर गेले आठ दशके अधिराज्य गाजिवणाऱया स्वर साम्राज सम्राजिनीचे दुखद निधन झाले.

त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्टच्या माध्यमातून राहुल नार्वेकर यांच्या भाषणाची चिरफाड केली. ‘कागदावर लिहून दिलेले मराठीही त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी?’ असा सवाल त्यांनी केला. ‘नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चालले असते. कारण त्यांचे मराठी कळले नाही, स्वाहिली, हिब्रू कोणालाच कळत नाही. शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसे मराठी वाचून दाखवत होते,’ असे राज ठाकरे यांनी नमूद केले. ‘नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहीत आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरू केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी झाली आहे,’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

नार्वेकरांची मराठी ऐकून एकाही आमदाराने विरोध दर्शवला नाही याबद्दलही राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सभागृहात देवेंद्र फडणवीस असते तरी त्यांना काही फरक पडला नसता. फोडाफोडीची कामे आणि अधिवेशनाचा उपचार पूर्ण झाली की बस. मग दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. माणूस शिक्षित असला पाहिजे, पण त्यापेक्षा तो सूज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंनाही याच्याशी घेणेदेणे असण्याचे कारण नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव मावळणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशीनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे-पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था? अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसे आणि सरकार आपण निवडून देत आहोत, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱया या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध, असा शेवट राज ठाकरे यांनी केला आहे.