
राज्यातील शेतीचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, अल-निनोच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यामुळे सध्या बळीराजा चिंताग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज भाजप आमदाराने प्रश्न मांडला होता, पण या प्रश्नावरील चर्चेला कृषी मंत्रीच विधानसभा सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सदस्य संतप्त झाले. भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची मागणी केली.
शेती आणि शेतकऱ्यांसंबंधित सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या चर्चेदरम्यान सर्वप्रथम अकोल्याचे भाजपचे आमदार रणधीर सावरकर बोलायला उभे राहिले. या विषयावर भाषण करीत असताना सभागृहात कृषी मंत्री, सहकार मंत्री आणि मदत पुनर्वसन विभागाचे मंत्री, त्या त्या विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणीही उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी सभागृहात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि अन्न प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे मंत्री उपस्थित होते. मात्र, शेती, कर्जमाफी आणि मदत या विभागाचे मंत्री, सचिव गैरहजर असल्याने भाजपचेच आमदार हरीश पिंपळे अत्यंत संतप्त झाले. मंत्री, अधिकारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, संजय कुटे, योगेश सागर यांनीही प्रशासनाला जाब विचारला.
विरोधक आक्रमक, अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी विरोधी पक्षाच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. आमदार कैलास पाटील, दिलीप सोपल, रोहित पाटील, ज्योती गायकवाड, अनंत नर, हारुन शेख आदींनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी करीत सचिवांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काही मिनिटांतच सभागृहात धावत पोहचले.





























































