भोस्ते घाटातील 180 मीटरच्या रस्त्यात 17 स्पीड ब्रेकर आणि 11 रंबलर, रस्त्याच्या डिझाईनची उडवली खिल्ली; शिवसेना आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतल्या भोस्ते घाटातीत 180 मीटरच्या रस्त्यात तब्बल 17 स्पीड ब्रेकर आणि 11 रंबलर लावले आहेत. घाटातील उतारावरचा हा रस्ता कोणी डिझाईन केला? कोटय़वधी रुपयांचे वाटोळे केले. शक्तिपीठ महामार्गासारखे मागणी नसलेले रस्ते तयार केले; पण मुंबई गोवा महामार्ग 15 वर्षांपासून हा रखडवला आहे. आता पावसाळ्यात जाऊन या रस्त्याची अवस्था बघा, अशा शब्दांत विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

विधानसभेत विरोधी पक्षाच्या नियम 293च्या प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव यांनी रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, जलजीवन मिशन योजनेचा उडालेला बोजवारा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मार्ट मीटर आणि अदानीला दिलेले पंत्राट अशा विविध विषयांवरून सरकारला धारेवर धरले. सरकारने जलजीवन योजनेचा मोठा गाजावाजा केला; पण 2024च्या निवडणुकांनंतर पेंद्र सरकारने योजनेसाठी निधी देण्याचे बंद केले. आता या योजनेसाठी राज्याला 60 हजार कोटी रुपयांची गरज आहे. आता पाणी योजनेसाठी पैसे नाहीत. पंत्राटदारांनी फक्त कमिशन घेतले. या कामासाठी एक कोटी रुपयांचे ‘मटेरिअल’ घेण्याची ज्यांची आर्थिक नाकद नव्हती त्यांना 200 कोटी रुपयांची टेंडर मिळाली.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी तीव्र संताप व्यक्त करताना भास्कर जाधव म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे फक्त रुंदीकरण करायचे होते. वडखळ, इंदापूर आणि माणगाव बायपास व कशेळी घाटातील दोन किमीचा बोगदा येवढेच काय ते नवीन काम होते. 2011मध्ये सुरू केलेले महामार्गाचे काम 2026मध्येही पूर्ण होत नाही.