
>> धीरज कुलकर्णी
खान्देशच्या मातीतील लेवा गणबोलीचा म्हणजेच अहिराणीचा अस्सल सुगंध आपल्या ओव्यांमधून चहूकडे दरवळत ठेवणारे बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे मराठी सारस्वतातील एक अद्भुत, अक्षय्य आणि क्रांतिकारी चमत्कार मानले जाते.
मराठी साहित्याच्या अथांग आणि समृद्ध प्रांगणात अनेक प्रज्ञावंतांनी आपल्या लेखणीचे वैभव उधळले आहे, परंतु अक्षरांची साधी ओळखही नसताना केवळ आपल्या अंतकरणातील उपजत प्रतिभास्पर्शाने मराठी मायबोलीला अलौकिक लेणे बहाल करणाऱ्या एका थोर भूमिकन्येचे नाव म्हणजे ‘बहिणाबाई चौधरी.’ खान्देशच्या मातीतील लेवा गणबोलीचा म्हणजेच अहिराणीचा अस्सल सुगंध आपल्या ओव्यांमधून चहूकडे दरवळत ठेवणारे बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे मराठी सारस्वतातील एक अद्भुत, अक्षय्य आणि क्रांतिकारी चमत्कार मानले जाते.
बहिणाबाईंचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमीच्या पवित्र पर्वावर जळगाव जिल्ह्यातील ‘असोदे’ या एका कृषिसंस्कृतीने बहरलेल्या गावी झाला. बालपणापासूनच त्यांना निसर्गाचे आदिम रूप आणि शेती-मातीच्या कष्टाची ओढ लाभली. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी जळगावचे नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र नियतीचा क्रूर खेळ असा की, वयाच्या तिसाव्या वर्षीच त्यांच्या कपाळावरील सौभाग्याचे लेणे पुसले गेले. तरुणपणीच वैधव्याचे अतीव दुःख कपाळावर घेऊन पदरात तीन निष्पाप मुले आणि समोर संसाराचा अथांग अथांग गाडा असतानाही या माऊलीने धीर सोडला नाही. उन्हापावसात शेतजमीन रापवत, घाम गाळत त्यांनी मुलांचे संगोपन केले. हाच दाहक जीवन संघर्ष पुढे त्यांच्या काव्याचा मुख्य झरा बनला.
पारंपरिक रूढ कवितांमध्ये अनेकदा विद्वानांची बौद्धिक कसरत, छंदांची पकड आणि संस्कृतप्रचुर शब्दांचा डामडौल असतो. याउलट बहिणाबाईंचे काव्य म्हणजे थेट काळजातून उसळून आलेला कारंजा होता. त्या निरक्षर होत्या, अक्षरांचे कोणतेही संस्कार त्यांच्यावर नव्हते, परंतु जेव्हा त्या पहाटेच्या शांत प्रहरात जात्यावर दळण दळत असत किंवा मातीच्या कुशीत खुरपणी करत असत, तेव्हा त्यांच्या ओठांतून निसर्गदत्त ओव्या अमृतासारख्या पाझरू लागत. त्यांच्या काव्यात बुद्धीचा अहंकार नव्हता, तर अनुभवाचा जिवंत पाझर होता. पारंपरिक ओव्या देवाच्या भक्तीत आणि मोक्षाच्या परिघात रमतात, तर बहिणाबाईंची अहिराणी बोली थेट ‘इहलोकीच्या’ मानवी सुख-दुःखांना आणि व्यावहारिक तत्त्वज्ञानाला कवेत घेते.
बहिणाबाईंच्या ओळीओळींमध्ये जगण्याचे, निसर्गाचे आणि माणुसकीचे जे अगाध तत्त्वज्ञान दडलेले आहे, ते भल्याभल्या तत्त्वज्ञांना थक्क करणारे आहे. संसाराच्या चक्रव्यूहाचे मर्म केवळ दोन ओळींत मांडताना त्या गातातः
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर
कष्टाच्या अग्नीतून तावून सुखाची भाकर कशी मिळते, हे सांगण्यासाठी त्यांनी चुलीवरच्या तव्याचे जे सुंदर आणि समर्पक रूपक वापरले आहे, ते अतुलनीय आहे. मानवी मनाच्या चंचलतेचे विश्वरूप दर्शन घडवताना त्या मनाला उभ्या पिकात घुसणाऱ्या अनावर गुराची उपमा देतात- ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर…’
त्यांचा निसर्गाकडे पाण्याचा दृष्टिकोन केवळ वरवरच्या सौंदर्याचा नव्हता, तर तो एका सेंद्रिय नात्याचा होता. ‘खोपा मधी खोपा’ या कवितेत सुगरण पक्ष्याच्या विणकामाचे कौतुक करताना त्या मानवाच्या बुद्धीला आणि विधात्याच्या अथांग कारागिरीला एकाच चौकटीत उभे करतात. माणसाच्या स्वार्थी आणि हिंस्र वृत्तीवर नेमके बोट ठेवत त्यांनी विचारलेला- ‘माणसा माणसा कधी होशील माणूस?’ हा प्रश्न मानवी अस्तित्वाला पडलेले आजवरचे सर्वात मोठे आणि कारुण्यमय कोडे आहे.
बहिणाबाई यात असताना त्यांचे हे वाङ्मयीन वैभव केवळ मौखिक स्वरूपात होते. सुदैवाने त्यांचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी आईच्या मुखातून प्रसवणारे हे काव्यधन कागदावर टिपून ठेवले. बहिणाबाईंच्या निधनानंतर (1951) जेव्हा हे शब्दरत्न आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हाती पडले, तेव्हा अत्र्यांनी त्याचे थक्क करून सोडणारे सौंदर्य ओळखले. 1952 मध्ये त्यांनी स्वतःच्या प्रदीर्घ आणि रसाळ प्रस्तावनेस ‘बहिणाबाईंची गाणी’ हा काव्यसंग्र प्रकाशित केला आणि या कवितांना साहित्यातील ‘अस्सल 24 कॅरेटचे चोख सोने’ अशी उपाधी दिली.
आज बहिणाबाईंच्या या अजरामर साहित्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जात आहे. त्यांच्या या उत्तुंग वाङ्मयीन ऋणाची कृतज्ञता म्हणून जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ हे नाव देण्यात आले आहे. ‘जे जगले, तेच गायले’ या उक्तीनुसार मराठी साहित्याला आपल्या घामाने आणि शब्दांनी सुवर्णतेज बहाल करणारी ही भूमिकन्या मराठी रसिकांच्या हृदयात सदैव आदराचे स्थान पटकावून राहील.


























































