
>> वर्णिका काकडे
कोलमी भाषेचे वर्गीकरण मध्य द्रविड भाषा म्हणून केले गेले आहे. ही महाराष्ट्र राज्यातील एक सुप्रसिद्ध द्रविड भाषा आहे. तेलगू आणि गोंडी यांसारख्या दक्षिण मध्य द्रविड भाषांचा तिच्यावर चांगलाच प्रभाव असून, ती एक आदिवासी द्रविड भाषासुद्धा आहे. कोलमी ही कोलम आदिवासी समूहाची बोलीभाषा आहे.
कोलाम आदिवासींची नोंद विशेष बिकट परिस्थितीतीत आदिवासी समूह म्हणून करण्यात आली असून महाराष्ट्रात त्यांच्यासह इतर केवळ दोन जमाती कातकरी आणि माडिया गोंड या गटात मोडतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही कोलाम आदिवासी राहतात.
महाराष्ट्रातले कोलाम स्वतला ‘कोलावर’ किंवा ‘कोला’ म्हणतात. त्याचा अर्थ बांबू किंवा लाकडाची काठी असा होतो. वेताच्या टोपल्या, चटया, सुपं इत्यादी करणं हा त्यांचा परंपरागत व्यवसाय.
कोलामी ही कोलाम या आदिवासी समूहांची बोलीभाषा आहे. कोलामी बोली शेजारच्या जिह्यातील गोंड भाषेपेक्षा बऱयाच प्रमाणात वेगळी आहे. काही मुद्दय़ात, कोलमी ही तेलुगू सोबत मिळती जुळती आहे आणि इतर बाबतीत कानडी प्रमाणे आहे. आसपासच्या परिसरातील संवाद संपर्कात आल्यामुळे भिल्ली भाषेचा प्रभाव जाणवतो. समानतेच्या बाबतीत इतर काही मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत जसे, निलगिरीची तोडा बोली व डॉ.ग्रीर्सन यांच्या मतानुसार, भाषा शास्त्राचा संदर्भ घेतल्यास, कोलाम हे द्रविड जमातींचे उर्वरित वंशज असावे. ज्यांनी कि मुख्य द्रविडी भाषेच्या विकासात कधीही भाग घेतला नाही किवा ज्यांनी कधीही द्राविडी भाषा अंगिकारली नाही.
युनेस्कोच्या जगातील धोक्यात असलेल्या भाषांच्या नकाशानुसार कोलामी भाषा खात्रीलायकरित्या धोक्यात असल्याची नोंद केली आहे. याचा अर्थ असा की लहान मुलं आता ही भाषा मातृभाषा म्हणून शिकत नाहीत.
महाराष्ट्रामध्ये कोलाम आदिवासींची लोकसंख्या 1,94,671 इतकी आहे (भारतातील अनुसूचित जमातींचे सांख्यिकीय विश्लेषण, 2013) पण यातले निम्म्याहून कमी लोकांचं कोलामी आपली मातृभाषा असल्याचं म्हणणं आहे. भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱया समुदायांचं जगणं टिपताना या भाषेचे मूळ लक्षात असते आणि या भाषांच्या संवर्धनासाठीची नेमकी बाजूही कळते.


























































