
अहमदाबादमधील रामोल-गताराड मार्गावरील महमूदपुरा परिसरातील एका खुल्या फटाका कारखान्यात शनिवारी दुपारी अचानक मोठा स्फोट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने तांडव केला आणि बघता बघता संपूर्ण परिसरात आग आणि धूर पसरला. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 10 हून अधिक कामगार गंभीररीत्या भाजले असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्फोटाचा आवाज 1 किलोमीटरपर्यंत ऐकू आला
कारखान्यातील स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला असी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आवाजाने भयभीत झालेले स्थानिक घराबाहेर पळाले. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. 108 रुग्णवाहिकादेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत अडकलेल्या आणि होरपळलेल्या कामगारांना बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासानुसार, फटाके तयार करताना निष्काळजीपणामुळे किंवा दारुगोळ्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































