
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने दर्शनरांगेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून भाविकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद होत असून, कमीत कमी वेळेत ‘श्रीं’चे दर्शन घडत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. या वर्षी प्रथमच दर्शनरांगेत 20 पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे.
दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहितीफलक, भक्तिसंगीतासाठी अत्याधुनिक ध्वनिप्रणाली, लाइव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशीनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसे वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, तसेच फॅन व कुलरची सुविधा उपलब्ध केली आहे. मंदिर समितीमार्फत भाविकांना मिनरल वॉटर, चहा, तांदळाची खिचडी व साबुदाणा खिचडी मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. दर्शनरांगेतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक तेथे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत.
यंदा दर्शनरांगेत कायमस्वरूपी दर्शनमंडपाचे बांधकाम सुरू असल्यामुळे अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, खासगी जागा उपलब्ध झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला. त्या ठिकाणी अत्याधुनिक तात्पुरते पत्राशेड उभारण्यात आले आहे. यामुळे दर्शनरांगेत कायमस्वरूपी चार व अतिरिक्त 16 अशा एकूण 20 पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे, असे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
मंदिर समितीने दर्शनरांगेतील वारकरी भाविकांना केंद्रस्थानी ठेवून केलेले सूक्ष्म नियोजन, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या प्रभावी समन्वयामुळे यंदाची दर्शनव्यवस्था अत्यंत सुरळीत झाली आहे. लाखो वारकऱयांना जलद, सुरक्षित आणि सुखकर दर्शन घडत आहे, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
आषाढीला एक लाख देशी वृक्षबियांचे वाटप
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने या वर्षी पदस्पर्श दर्शनरांगेत येणाऱया वारकरी भाविकांना एक लाख देशी वृक्षबियांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक भाविकाने आपल्या गावात परतल्यानंतर किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
190 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शनरांग, पत्राशेड आदी ठिकाणच्या घटना, घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 190 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
माउलींच्या स्वागतासाठी सोलापूर प्रशासन सज्ज
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मानाच्या पालखी सोहळ्यासह सर्व पालख्या, दिंडय़ा व लाखो वारकरी सोलापूर जिह्यात येत आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे उद्या (दि. 19) सोलापूर जिह्यात धर्मपुरी येथे आगमन होत आहे, तर सोमवारी (दि. 20) अकलूज येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होत आहे. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
संत ज्ञानेश्वर माउली पालखीच्या स्वागतासाठी उद्या (दि. 19) धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, आमदार उत्तम जानकर यांच्यासह जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांच्यासह विजया पांगरकर, सूर्यकांत भुजबळ, दिलीप पवार, सुरेश शेजुळ, सचिन इथापे, तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर, भंडी शेगाव व वाखरी येथील पालखी मुक्काम, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणांची पाहणी केली.


























































