
ओएलएक्स संकेतस्थळावरून एका भामट्याने महिलेला साडेबारा लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील जुना सोफा विक्रीसाठी काढून त्याचे फोटो ओएलएक्सवर टाकले असता एका भामट्याने कॉल करून खरेदी करण्याचा बहाणा केला व या महिलेला लुटले.
मीरा रोड येथील कनकिया रोड परिसरात राहणाऱ्या दीप्ती जाधव यांनी घरातील जुना सोफा विकण्यासाठी ओएलएक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सोफ्याचे छायाचित्र आणि किंमत अपलोड केली होती. ही जाहिरात पाहून त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव राजेश मिश्रा असून सोफा खरेदी करायचा आहे असे सांगितले. विश्वास संपादन करून सायबर भामट्याने विविध कारणे सांगत दीप्ती यांच्याकडून क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. त्यानंतर आठ दिवसांत आरोपीने त्यांच्या क्रेडिट कार्डवरून टप्प्याटप्प्याने एकूण १२ लाख ३५ हजार ८२९ रुपये काढून घेत फसवणूक केली.





























































