
रस्ते की खड्डय़ांचे जाळे अशी नाशिक शहरातील स्थिती आहे. खड्डे अपघाताने नाशिकमध्ये मृत्यू होतायेत, हे निषेधार्ह आहे. मेले तर मरू द्या, आंदोलनासाठी बसायचं तर बसा, असं केलं तर एक दिवस सर्वच एकत्र येतील. मंत्री गिरीश महाजन, महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या परिस्थितीकडे लक्ष द्यायला हवे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावले. माणुसकी दाखवा, लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, असा इशाराच त्यांनी दिला.
नाशिकमध्ये शुक्रवारी छगन भुजबळ हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. खड्डय़ामुंळे नागरिकांचे मृत्यू होत आहेत, याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. यावर ते म्हणाले की, कारवाई करणारेच अधिकारी डोळे झाकून बसले असतील तर कारवाई कशी होणार? कामचुकार अधिकाऱयांवर कारवाई व्हायला पाहिजे, ते फक्त ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाहीत. कॉन्ट्रक्ट दिले अन् मोकळे झाले, हे चालणार नाही. त्याच्याकडून योग्य काम करून घेतले पाहिजे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी यात लक्ष घातले पाहिजे. शहरातील रस्ते, पाणी यांसह पायाभूत सुविधांबाबतची होणारी गैरसोय दूर करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असते. लोकप्रतिनिधी हे सूचना करू शकतात, अधिकार मात्र आयुक्तांनाच आहेत, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन थोडीशी माणुसकी दाखवायला हवी. महापौर, उपमहापौर, अधिकाऱयांनी त्यांच्याकडे जायला हवे. या प्रश्नावर होणाऱया आंदोलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसे झाले तर एक दिवस सगळेच तिकडे येतील. लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, असा इशाराच भुजबळ यांनी सत्ताधाऱयांना दिला.


























































