विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपच्या गुंडांकडूनच पोलिसांवर दगडफेक, अभिजित दीपकेंचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात भाजपने गुंड घुसवले होते. त्या गुंडांनी केलेल्या दगडफेकीतच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. विद्यार्थ्यांनी कोणतीही हिंसा केलेली नाही, असा आरोप कॉक्रोच पार्टीचे अभिजित दीपके यांनी आज केला.

जंतरमंतरवरील आंदोलनात जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. आंदोलनात पोलिसांवरदेखील दगडफेक झाली, असे त्यांनी सांगितले. एका पोलिसाच्या मुलीने आपल्या वडिलांच्या डोक्याला पाच टाके पडल्याचे त्यात सांगितले. प्रसारमाध्यमांनी याबाबत दीपके यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा आंदोलनात मारामारी करणारे भाजपचे गुंड होते, असे सांगितले.

पोलिसांसोबत जे झाले ते वाईटच झाले. पण दगड कोणी आणून ठेवले होते? दगडांनी भरलेला ट्रक तिथे कसा आला? हे सगळे भाजपच्या लोकांनी केले, असे दीपके म्हणाले. दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केले नाही त्यांना का त्रास दिला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवायला पोलिसात भरती झाले का?

विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवण्यात आली. बिहारमध्ये एके-47 चालवण्यात आली. यासाठी पोलिसात भरती झाले का, असा सवाल करत अभिजित दीपके म्हणाले की, भाजपच्या गुंडांनी निशू नावाच्या मुलीच्या वडिलांचे डोके फोडले. त्यांना अटक का केली जात नाही असे विचारले असता आम्ही असेच कोणालाही अटक करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर त्या गुंडांनी व्हिडीओ बनवला, ‘‘अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा तो और मारुंगा,’’ असे त्यांनी त्यात म्हटले होते. तेव्हा पोलीस कोणाच्या इशाऱयावर गप्प होते, असा संतप्त सवाल दीपके यांनी केला.