
गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारने बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि उलवे येथे जागेचा शोध सुरू केला आहे. परंतु गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काची घरे द्या, अशी ठाम भूमिका संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मांडली आहे.
गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणार म्हणजे देणारच असे आश्वासन राज्य सरकारने वारंवार गिरणी कामगारांना दिले. परंतु आता मुंबईबाहेरील जागेचा शोध घेतला जात असून सरकारने गिरणी कामगारांची क्रूर थट्टा केली आहे, असा आरोप संयुक्त मराठी मुंबई चळवळ (कामगार विभाग) कार्याध्यक्ष रमाकांत बने यांनी केला आहे.
…. अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार
गिरणी कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून मुंबई घडवली, मग गिरणी कामगारांना मुंबईत घर का नाही, असा सवाल गिरणी कामगार नेते हेमंत गोसावी यांनी उपस्थित केला आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत अन्यथा न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

























































