
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी हे ब्रीद वाक्य घेऊन वाहतूक सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास फलाट क्र. 3 मध्यवर्ती बसस्थानकात प्रवासी महिला अरुणा सुनील जैन (40, रा. राजस्थान) या मालेगावला जाण्यासाठी निघाल्या असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी हृदयविकाराचा झटका येऊन महिला अचानक कोसळताच वाहक संगीता पालवे यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला सीपीआर दिला. याकामी त्यांना कविता भुते यांनीही मदत केली.
यावेळी परिस्थितीचे भान ठेवून एसटी अधिकारी बाबासाहेब साळूंके, सुरक्षारक्षक रवींद्र गरड यांनी तातडीने रिक्षात बसवून घाटीत दाखल केले. महिला रुग्णाला वेळेत घाटी रुग्णालयात मिळालेल्या उपचारामुळे जीवदान मिळाले. सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी प्रवास करण्यासाठी निघालेल्या या महिलेस अस्वस्थ वाटू लागले व काही क्षणांतच ती बेशुद्ध पडली.
सुरक्षारक्षक, वाहकाने महिला प्रवाशाचा जीव वाचविला, मध्यवर्ती बसस्थानकातील घटना; कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुकhttps://t.co/RTVZ8CCkcg pic.twitter.com/c7efWDDc6r
— Saamana Online (@SaamanaOnline) August 3, 2026
वाहक संगीता पालवे यांनी तत्काळ सीपीआर दिल्याने महिलेची श्वसनक्रिया पूर्ववत होण्यास मदत झाली. यानंतर पुढील उपचारासाठी घाटीत हलविल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली. एरव्ही विमान, रेल्वे आदी ठिकाणी रुग्णसेवा दिल्याचे आपण ऐकत आलो असताना बसस्थानकात दिलेल्या या सेवेमुळे एसटी सेवेवरचा विश्वास पुन्हा वाढला आहे.





























































