हिंदुस्थानसाठी डब्ल्यूटीसीचे दार अजून उघडे; अंतिम फेरीसाठी आता प्रत्येक कसोटी असणार फायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीचे स्वप्न अजून जिवंत असले तरी हिंदुस्थानचा प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक खडतर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील धक्क्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे आता चुका करण्याची मुभाच उरलेली नाही. अंतिम फेरी गाठायची असेल तर पुढील प्रत्येक कसोटी ‘फायनल’ समजून खेळावी लागणार आहे.

हिंदुस्थानने आतापर्यंत नऊ कसोटींपैकी चार जिंकल्या, चार गमावल्या, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे संघाचा पॉइंट्स टक्केवारी (पीसीटी) 48.15 इतकीच असून, डब्ल्यूटीसीच्या शर्यतीत ती पुरेशी नाही. कारण अंतिम फेरीचे तिकीट एकूण गुणांवर नव्हे, तर पीसीटीवर ठरते. हिंदुस्थानसमोर अजून नऊ कसोटी सामने बाकी आहेत. त्यात प्रथम श्रीलंकेत दोन, त्यानंतर न्यूझीलंडमध्ये दोन आणि शेवटी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल पाच कसोटींची मालिका खेळायची आहे. या तीन मालिकाच हिंदुस्थानचे भविष्य ठरवणार आहेत.

डब्ल्यूटीसीचे समीकरणही तितकेच कठीण झाले आहे. इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहायचे नसेल, तर हिंदुस्थानला उर्वरित नऊपैकी किमान आठ कसोटी जिंकाव्याच लागतील. त्यानंतरच पीसीटी अंदाजे 68.52 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जो अंतिम फेरीसाठी सुरक्षित मानला जातो. जर फक्त सात विजय मिळाले, तर पीसीटी सुमारे 62.96 राहील आणि मग ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांसारख्या प्रतिस्पर्धी संघांच्या निकालांवर हिंदुस्थानचे भवितव्य अवलंबून राहील.

हिंदुस्थानसाठी खरे आव्हान परदेशात आहे. श्रीलंकेतील फिरकी आणि न्यूझीलंडमधील स्विंग-सीम या दोन्ही आव्हाने पार केल्यावरच घरच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच कसोटींची मालिका अंतिम फेरीचे तिकीट ठरवू शकते. त्यामुळे आता हिंदुस्थानसमोर पर्याय एकच – जिंकत राहा… अन्यथा डब्ल्यूटीसीचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरेच राहील.

खेळाडूंच्या फिटनेसवर बीसीसीआयचा ‘दंडुका’, ‘टीम इंडिया’साठी नवे कठोर नियम; संघात टिकायचे, तर धावावेच लागेल