
देशात मान्सूनचा जोर कायम असून, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील पूरस्थिती विशेषतः गंभीर बनली असून, मृतांचा आकडा 98 वर पोहोचला आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमधील सुमारे 1.55 लाख नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या भागांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गाझियाबाद, मेरठ, आग्रा, मथुरा, कानपूर, मिर्झापूर, बिजनौर, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, गोरखपूर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, वाराणसी आणि प्रयागराज यांसह अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ताशी 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिहारमध्येही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पाटणा, गया, बक्सर, सारण, सिवान, जहानाबाद, बेगुसराय, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, किशनगंज, अररिया, सुपौल, सहरसा, खगरिया, भागलपूर आणि लखीसराय या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 65 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
राजधानी दिल्लीत शनिवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबत ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. कमाल तापमान सुमारे 33 अंश, तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज आहे.
आसाममध्ये पूरस्थिती अद्याप चिंताजनक आहे. अधिकृत माहितीनुसार 13 जिल्ह्यांतील 464 गावे पुराच्या पाण्याने प्रभावित झाली आहेत. शिवसागर, गोलाघाट, नागाव, होजाई, सोनितपूर, धेमाजी, दररंग, बिस्वनाथ, कामरूप (मेट्रो), लखीमपूर, उदलगुरी, जोरहाट आणि चराईदेव या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. मृतांचा आकडा 98 वर पोहोचला असून 1.55 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत.




























































