गुगल ड्राईव्हवरून फोटो-व्हिडीओ ऑटो-बॅकअप सेवा बंद; युजर्सला धक्का, आता आपोआप सिंक होणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील कोटय़वधी लोक फोटो आणि व्हिडीओसाठी गुगल ड्राईव्ह वापरतात, परंतु गुगलने आपल्या युजर्सला धक्का दिला असून गुगल ड्राईव्हवरून फोटो आणि व्हिडीओची ऑटो बॅकअप सेवा आजपासून बंद केली आहे. या निर्णयामुळे आता ‘ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप’ अॅपच्या मदतीने संगणकावरील फोटो आणि व्हिडीओ आपोआप ‘गुगल फोटो’मध्ये सिंक होणार नाहीत. या बदलाची कल्पना गुगलने जूनमध्येच वापरकर्त्यांना दिली होती.

या बदलामुळे गुगल ड्राईव्हवर आधीच अपलोड असलेले जुने फोटो आणि व्हिडीओ जाणार का? अशी भीती युजर्सच्या मनात आहे. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वी गुगल फोटोवर बॅकअप घेतलेले सर्व फोटो आणि व्हिडीओ पूर्णपणे सुरक्षित असून ते डिलीट होणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. संगणकावरील नेहमीच्या फाईल्स गुगल ड्राईव्हवर सिंक करण्याची प्रक्रिया नेहमीप्रमाणेच सुरू राहील. केवळ फोटो आणि व्हिडीओ अपलोड होणार नाहीत. अँड्रॉईड आणि आयओएस (आयपह्न) मोबाईल वापरकर्त्यांना यातून दिलासा मिळाला आहे.

 स्मार्टफोनमध्ये ‘गुगल फोटो’ अॅपद्वारे होणारा ऑटोमॅटिक बॅकअप नेहमीसारखाच चालू राहील. गुगल आपल्या डिजिटल सेवा सुलभ, सुटसुटीत आणि ग्राहकस्नेही करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे गुगलने म्हटले आहे. या बदलामुळे ‘गुगल ड्राईव्ह’ आता केवळ क्लाऊड स्टोरेज आणि फाईल-सिंकिंग करेल, तर ‘गुगल फोटो’ ही स्वतंत्रपणे फोटो व व्हिडीओ मॅनेजमेंट आणि बॅकअपसाठी वापरली जाईल.