
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी नागरी समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड वाचवण्यासाठी आंदोलनाचे ऐलान केले. भाजपने जमिनी ढापायची मोहीमच उघडली आहे. मात्र आम्ही मोकळय़ा जागा कंत्राटदार, बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही, असे सांगत पालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी वरळीसह मुंबईतील विविध नागरी प्रश्नांबाबत त्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मोकळ्या जागांचा विषय केवळ पालिकेपुरता मर्यादित नसून ‘म्हाडा’, ‘एमएमआरडीए’ अशा विविध प्राधिकरणांबाबतही असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील तब्बल 400 कोटींच्या 16 एकर जागा केवळ 21 कोटींच्या वार्षिक बदल्यात खासगी विकासकांच्या घशात घातल्या जात आहेत. त्यामुळे हा लढा मुख्यमंत्र्यांविरोधात असल्याचेही ते म्हणाले. या वेळी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पद्मजा चेंबूरकर, आबोली खाडे, नगरसेवक निशिकांत शिंदे, विजय भणगे, चिंतामण निवाते आदी उपस्थित होते.
आता तिरंगा आठवला?
जेव्हा विद्यार्थी तिरंगा आंदोलन करीत होते तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला. टिअर गॅस सोडला, एके-47 चालवल्या तेव्हा तिरंग्याचा अवमान झाला नाही का यांना आताच तिरंगा आठवला का, असा सवालही त्यांनी भाजपच्या तिरंगा रॅलीवर केला.
आधी बेरोजगारीवर बोला
डिलिमिटेशनमध्ये खासदारांची संख्या 850वर नेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या वाढणाऱया जागांमुळे त्यांच्यावर होणारा खर्चही वाढणार असून करदात्यांचा पैसा जाणार आहे. यामुळे परिस्थिती बदलणार नाही. फक्त 400 जणांना रोजगार मिळेल. त्यामुळे आधी देशातील बेरोजगारीवर बोला, असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱयांना दिले. अधिकारांचे विकेंद्रीकरण करा, स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक सक्षम करा, खासदारांचा फंड वाढवा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आधी पात्रता निश्चित करा, नंतरच सेंच्युरी मिल जागेचे पुनर्वसन करा
वरळी सेंच्युरी मिल जागेच्या पुनर्विकासात आधी स्थानिकांना विश्वासात घ्या, स्थानिक रहिवाशांच्या पात्रता निश्चित करा अशी मागणीही या वेळी आयुक्तांकडे करण्यात आली. शिवाय प्रभादेवी येथील सेंच्युरी मिल ‘म्हाडा’ संक्रमण शिबीर परिसरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुधारा, वरळीतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवा, अॅनी बेझंट मार्गावरून हिंद सायकल मार्ग खुला करा, कोळीवाडा येथील 40 वर्षे जुन्या झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी करून त्या ठिकाणी ‘सीबीएसई’ शाळा सुरू करा, वरळी-प्रभादेवीतील निष्क्रीय कंत्राटदाराचा ठेका रद्द करा, आदी मागण्याही पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना वरळी-प्रभादेवीतील नागरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.
भाजपच्या भूखंड ढापायच्या योजनेविरोधात शिवसेना पालिकेवर मोर्चा काढणार असून त्यात इतर पक्षही सहभागी होतील. मोकळ्या जागा वाचवणे, ‘बेस्ट’ वाचवणे, नागरी प्रश्नांसाठी हे आंदोलन होईल. – आदित्य ठाकरे
यांना मुंबईकरांचा पैसा स्वतःवर खर्च करायचाय
आम्ही मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी खर्च केला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाच भाषांमध्ये टॅब दिले. मात्र आता सत्ताधाऱयांना स्वतःसाठी, मेयर बंगलोसाठी, गाडय़ांसाठी खर्च करायचा आहे, स्वतःसाठी टॅब पाहिजेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

































































