
महापौर रितू तावडे यांची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यासाठी पालिकेकडून तब्बल 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी मे. रनटाईम सोल्युशन प्रा.लि. कंपनीला कंत्राट देण्याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. यावरून मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कशाला करता, असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. भाजप मुंबईकर-पालिकेच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महापौर रितू तावडे यांच्या प्रसिद्धीवर वर्षाला 40 ते 50 लाख खर्च होत असतील तर हा मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. महापौर तावडे आता मात्र ‘हा माझा खर्च नाही,’ असे सांगत असतील तर मग हा पैसा कोणासाठी आणि कोणाच्या आदेशाने खर्च केला, असा थेट सवालही त्यांनी केला. महापालिका ही मुंबईकरांच्या कराच्या पैशांतून चालते. या पैशांचा वापर नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र महापौर कुठे गेल्या, कोणाला भेटल्या, कुठे बसल्या, काय पाहिले याच्या ‘रील’ आणि समाजमाध्यम प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असतील, तर हा मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
शिंदे गटाचाही विरोध
महापौरांवरील खर्चावरून पालिकेतील भाजपचे सत्तेतील वाटेकरी शिंदे गटानेही या खर्चावर आक्षेप घेत मुंबईकरांचा पैसा वाचला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार आहे, महापौरांनी आमचा सल्ला मानावा की नाही हे त्यांचे मत असल्याचे शिंदे गटाचे गटनेते अमेय घोले यांनी सांगितले.
महापौरांनी आयुक्तांकडे केली होती मागणी
सोशल मीडियावरील खर्चावरून वाद झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकियेत आपला हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. मात्र महापौर रितू तावडे यांनी 20 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांना पत्र देऊन 1 सोशल मीडिया एक्सपर्ट, 1 फोटोग्राफर आणि 1 व्हिडिओग्राफर देण्याची मागणी केल्याचे पत्रच समोर आल्याने महापौरांच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या जनसंपर्क विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या ठिकाणी सहाय्यक आयुक्त नेमण्यासाठीदेखील महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
हा बडेजाव थांबवा!
महापौर पद हे मुंबईकरांच्या पैशांतून बडेजाव उपभोगण्यासाठीचे पद नाही. मुंबईकरांची सेवा करण्याचे हे पद आहे. महापौरांनी दात्याची भूमिका घ्यायला हवी, घेत्याची नाही! महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनसंपर्क विभाग असताना जादा खर्च कशाला? ही उधळपट्टी ताबडतोब थांबवा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली.































































