
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेत सहभाग आणि खंडणीद्वारे व्यापारात अडथळा आणल्याच्या आरोपावरून अमेरिकेची तपास संस्था एफबीआय (FBI) हिंदुस्थानी नागरिक कमल याचा शोध घेत आहे. कमल हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय भाग असल्याचे एफबीआयने गुरुवारी स्पष्ट केले. खंडणी उकळणे आणि व्यापारात हस्तक्षेप करण्याच्या कटात तो सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टाने 1 जुलै रोजी त्याच्याविरुद्ध फेडरल अटक वॉरंट जारी केले आहे.
फेडरल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई या गँगचा उगम हिंदुस्थानातील पंजाब राज्यात झाला. मात्र, सध्या ही टोळी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसह इतर अनेक ठिकाणी कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एफबीआयने कठोर कारवाई सुरू केली असून, याच मोहिमेचा भाग म्हणून गेल्या काही महिन्यांत बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया टोळ्यांशी संबंधित अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
या फरार आरोपीला अटक करण्यासाठी एफबीआयने नागरिकांना आवाहन केले आहे. एफबीआयच्या सूचनेनुसार, कमल किंवा या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी त्वरित स्थानिक एफबीआय कार्यालय, जवळचा अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याव्यतिरिक्त, नागरिकांना ‘tips.fbi.gov’ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीनेही माहिती देण्याचे आवाहन केले आहे.




























































