
दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात सीआरझेड क्षेत्रातील खारफुटीची बेसुमार कत्तल करून सुमारे 200 एकर जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम प्रचंड वेगाने सुरू आहे. आजूबाजूच्या शहरातील इमारतीच्या बांधकामाचा रोज शेकडो ट्रक राडारोडा आणून खाडी बुजवत नवीन जमीन तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असून महसूल खाते, पोलीस आणि प्रशासनाच्या डोळय़ासमोर खाडीवर दिवसाढवळय़ा हा दरोडा घातला जात आहे. ही 200 एकर जमीन लाटतंय तरी कोण, यामागे कोणते राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल केला जात असून राष्ट्रीय हरित लवादानेही याची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेला फटकारले आहे.
ठाणे आणि लगतच्या शहरातील जमिनीला आलेला सोन्याचा भाव पाहून मुंब्रा-दिव्यातील रेल्वे लाइनच्या शेजारी असलेल्या खाडीतील शेकडो एकर खारफुटीवर भूमाफियांचा वरवंटा सुरू आहे. या विस्तीर्ण जमिनीवर पसरलेली जैवविविधता आणि कांदळवनांची बेसुमार कत्तल केली जात आहे. इमारतींचा राडारोडा आणून ही खारफुटी कचऱ्याखाली गाडली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील खारफुटीवर सुरू असलेल्या बेकायदा भरावावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही दिवसांपूर्वी मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत भराव टाकण्याला परवानगी नसतानाही तो रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. दरम्यान, यावर महसूल व वन विभागाने गुन्हा दाखल केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले, मात्र त्यानंतरही पुन्हा हा भराव वाढतच असल्याने या गोरखधंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे? यामागे मोठे राजकीय कनेक्शन आहे काय, असा सवाल करत पर्यावरण अभ्यासकांनी ठाणे महापालिकेच्या भूमिकेवरच शंका व्यक्त केली आहे.
कांदळवन, तलाव, पाणथळ जागा नष्ट
ठाण्यामध्ये वेगवेगळय़ा विकास प्रकल्पांच्या नावाखाली बेछूट वृक्षांची कत्तल होत असतानाच मुंब्रा, दिवा भागातील खाडीवरच दरोडा पडत असल्याने येथील कांदळवने, तलाव आणि पाणथळ जमीन नष्ट झाली आहे. येथील जैवविविधता जमीन सपाटीकरणाच्या राडारोडय़ाखाली चिरडून गेली आहेत. खाडीचा नैसर्गिक जलप्रवाह रोखला गेला आहे. पाणथळ जागेवर भरणी केल्यामुळे भविष्यात पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद आणि पर्यावरण तज्ञ रोहित जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रारी करून दाद मागितली आहे.
ठाणे महापालिकेचे वागणे बेजबाबदार
मुंब्रा, दिवा आणि कळव्यातील रेल्वे स्टेशनजवळील खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करून सुरू असलेल्या प्रचंड भरावाची आणि सपाटीकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा भराव चुकीच्या पद्धतीने सुरू असून तो तातडीने हटवा, असे सांगितले असतानाही ठाणे महापालिका याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल हरित लवादाने केला. ठाणे महापालिकेचे हे वागणे अत्यंत अयोग्य आहे. तीन महिन्यांच्या आत हा कचरा, राडारोडा उचला आणि ही जागा पूर्णपणे मोकळी करा, असे आदेशच हरित लवादाने ठाणे महापालिकेला दिले आहेत. या जागेवर पुन्हा कचरा होणार नाही यासाठी सक्तीच्या उपाययोजना करा, असेही हरित लवादाने ठाणे महापालिकेला बजावले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास करण्यामागे कोणते राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी आणि खासगी विकासक आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. – स्टॅलिन दयानंद, पर्यावरणवादी
कधी कांदळवनात तर कधी जंगलात कचरा टाकून पर्यावरणाचा अत्यंत वेगाने ऱ्हास केला जात आहे. ठाणे महापालिकेने आतापर्यंत किती कांदळवने नष्ट केली याकडेही हरित लवादाने लक्ष द्यावे. एखाद्या सरकारी यंत्रणेकडून कांदळवन उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात असेल तर हे दुर्दैवी आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाने ठाण्याचे वाटोळे केले आहे. – जितेंद्र आव्हाड, (स्थानिक आमदार)
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी जे आदेश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका करेल. तसेच न्यायालयाचा आदेशाचे पालन करून पुढील कार्यवाही केली जाईल. – प्रशांत रोडे, (अतिरिक्त आयुक्त, ठाणे पालिका)





























































