
मराठा आरक्षण तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड तसेच हिंगोली जिल्हय़ांत शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव बोंढारकर यांना मराठा तरुणांनी समाजासाठी काय केले, असा सवाल करत हाकलून लावले.
नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव बोंढारकर हे आल्याचे पाहून मराठा कार्यकर्ते संतापले. तुम्ही मनोज जरांगे यांना भेटलात का? असा सवाल मराठा कार्यकर्त्यांनी आमदारांना केला. आमच्या मागण्यांसाठी तुम्ही काय केले?, मराठा समाजासाठी काय केले? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. मराठा कार्यकर्त्यांसमोर आमदार निरुत्तर झाले. आमच्या रॅलीत सहभागी व्हायचे नाही, निघून जा, असे मराठा कार्यकर्त्यांनी निक्षून सांगितल्यानंतर या दोन्ही आमदारांनी तेथून काढता पाय घेतला.
तीन दिवसांत निर्णय घ्या नाहीतर सलाईन आणि पाणी बंद करणार – जरांगे
सरकारसोबतची चर्चा फिसकटल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरू होते. सरकारला आतापर्यंत वेळच देत आलो, पण येथून पुढे एक क्षणाचाही वेळ देणार नाही. निर्णय घ्या, नाहीतर तीन दिवसांनंतर सलाईन, पाणीही बंद करणार असल्याचा स्पष्ट इशारा जरांगे यांनी दिला. सरकारने 11 सप्टेंबरपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 12 सप्टेंबर रोजी मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होईल. त्यात मुंबईतील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल, असेही जरांगे म्हणाले.





























































