
दिल्लीच्या जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीमार अतिशय वेदनादायी आणि गंभीर चिंतेचा विषय असल्याचे परखड मत मांडत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी पोलिसांकडून झालेल्या बलप्रयोगावर नाराजी व्यक्त केली.
माजी संरक्षण सचिव यशोवर्धन आझाद यांच्या ‘पोलिसिंग द रिपब्लिक’ या पुस्तकाचे दिल्लीत आज प्रकाशन झाले. त्यावेळी न्या. भुयान हे बोलत होते. जंतर मंतरवरील घटनेबाबत ते म्हणाले की, बळाचा अतिरेकी वापर न करता किंवा मानवाधिकारांचे उल्लंघन न होऊ देता प्रभावित पोलिसिंग करता येऊ शकते. जेव्हा तरुण आयपीएस अधिकारी स्वतः जाऊन आंदोलक आणि निदर्शकांवर बळाचा वापर करतात, हे पाहून अतिशय निराशा होते. हे अतिशय व्यथित करणारे आहे.
पोलिसांसाठी विश्वासार्हता महत्त्वाची
सर्वसामान्य नागरिकांसाठी हातात शिट्टी आणि लाठी घेऊन उभा असलेला एक पोलीस म्हणजे सामर्थ्य आणि देशाच्या अधिकाराचे प्रतीक असतो. अन्याय झाल्यावर ते पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतात. त्यामुळे विश्वासार्हता जपणे, हे पोलीस दलासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, असे न्या. भुयान म्हणाले.
मणिपूरमध्ये शांतता मृगजळासारखीच
न्या. भुयान म्हणाले, ‘मणिपूरमध्ये प्रचंड प्रतिभा दडलेली आहे. या राज्यात हिंसाचारामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मणिपूर रायफल्स, आसाम रायफल्स, लष्कर तसेच निमलष्करी दलांची मोठय़ा प्रमाणावर तैनाती आहे. तरीही तेथे शांतता अजूनही मृगजळासारखीच दूर आहे. आपल्यासाठी, हिंदुस्थानसाठी हा मोठा धडा आहे.’






























































