
शहापूर तालुक्यातील खरांगण गावाजवळ शाई नदीवर बांधण्यात आलेल्या केटी बंधाऱ्याचे पाणी शेतात घुसल्याने ३० ते ४० शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीची अक्षरशः माती झाली आहे. बंधाऱ्यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाह बदलल्याने भात, भुईमूग, मूग, उडीद, नाचणी आणि भाजीपाला ही पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आता करायचे तरी काय, असा सवाल बळीराजाला पडला आहे.
मृद व जलसंधारण विभागाने मे महिन्यात शाई नदीवर बंधारा बांधला. यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र या बंधाऱ्याचे काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही किंवा ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप शेतकरी संदीप हरड यांनी केला आहे. शाई नदीवर अनेक बंधारे असताना नव्या बंधाऱ्याची गरज काय, असा सवालही त्यांनी केला आहे. शेती हेच उपजीविकेचे साधन असल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जिवंत असल्याचा पुरावा मागितला
खरांगण येथील सोनूबाई हरड यांच्या कुटुंबाची सहा एकर शेती नदीपात्राजवळ आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह बदलला आणि पाणी सोनूबाई यांच्या शेतात घुसले. हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शहापूरच्या मृद व जलसंधारण विभागात नुकसानीबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांकडे अधिकाऱ्यांनी सोनूबाई जिवंत असल्याचा पुरावा मागितला. चालता-फिरता येत नसतानाही सोनूबाईंना कार्यालयात आणून अधिकाऱ्यांसमोर उभे करावे लागल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
– “मृद व जलसंधारण विभागाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाच्या महिला अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा संपर्क न करता त्या निघून गेल्या.”
– संदीप हरड, शेतकरी





























































