
आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि उपराज्यपालांना पत्र लिहून सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री प्रवेश वर्मा, त्यांचे सहकारी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये एसएचओ घनश्याम किशोर आणि एसीपी निर्मल यांचा समावेश आहे. आंदोलक महिलांचा विनयभंग, पुरावे नष्ट करणे, मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे, असे गंभीर आरोप भारद्वाज यांनी केले आहेत.
काय आहे प्रकरण?
२९ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ सप्टेंबरला मनोहर नगर गुरुद्वाराजवळ रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबतच्या गैरव्यवहाराचे चित्रीकरण २२ वर्षीय साहिब सिंग करत होता. त्यावेळी मंत्री प्रवेश वर्मा यांनी साहिब सिंगला मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. कथित भ्रष्टाचार आणि त्यानंतर झालेल्या बाचाबाचीचे डिजिटल पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईल हिसकावल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. तसेच यावेळी उपस्थित असलेले एसएचओ घनश्याम किशोर आणि इतर पोलिसांनी वर्मा यांना अडवण्याऐवजी त्यांना घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आला होता.
पोलिसांवर मारहाण आणि विनयभंगाचा आरोप
या घटनेनंतर एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी सौरभ भारद्वाज, स्थानिक आमदार जरनैल सिंग, रहिवासी आणि आपचे कार्यकर्ते डीसीपी कार्यालयाकडे गेले असता रात्री ९:४० च्या सुमारास पोलिसांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर सर्वजण शांततेत आंदोलनाला बसले. मात्र रात्री १० च्या सुमारास एसएचओ, एसीपी आणि निमलष्करी दलाच्या जवानांसह मोठ्या पोलीस फौजफाट्याने आंदोलकांवर बळाचा वापर केला, असा भारद्वाज यांचा आरोप आहे.
याचवेळी, पुरुष पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना (ज्यामध्ये साक्षी गुप्ता यांचा समावेश होता) जाणीवपूर्वक स्पर्श करत त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे. तसेच आपल्यालाही पोलिसांनी शर्टाच्या कॉलरला धरून वेगवेगळ्या दिशेने ओढत मारहाण केली आणि गळा दाबून गुदमरण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांनी केला. “माझा श्वास गुदमरला होता आणि मी बेशुद्ध पडलो. काही महिला कार्यकर्त्यांनी माझ्या शर्टाची बटणे तोडून मला मोकळा श्वास घेऊ दिला म्हणून माझा जीव वाचला,” असे भारद्वाज यांनी म्हटले आहे. सूर्यास्तानंतर महिलांना पुरुष पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले, जे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून ते आपण तपास यंत्रणांना देण्यास तयार असल्याचे भारद्वाज यांनी म्हटले आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामावरून सुरु झालेल्या या वादात पोलिसांनी आपचे आमदार जरनैल सिंग यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे, तर मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी आता आप नेते आक्रमक झाले असून, जोपर्यंत प्रवेश वर्मांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.




























































