बंजारा समाजाला ‘एसटी’ प्रवर्गाचे आरक्षण द्या! जिंतूरच्या पोखरणी तांड्यावर तरुणाने जीवन संपवले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात बंजारा समाजाला आदिवासी (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी पेटलेल्या लढय़ाचा वणवा आता अधिकच तीव्र झाला आहे. सरकारकडून बंजारा समाजावर होणाऱया अन्यायाविरोधात रोष व्यक्त करत आरक्षणासाठी जिंतूर तालुक्यातील पोखरणी तांडा येथील 35 वर्षीय तरुण विठ्ठल चव्हाण याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित  जमाती (एसटी) प्रवर्गात करण्यात यावा, ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली जात आहे. शासन या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून विठ्ठल चव्हाण यांनी विष प्राशन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.