
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना विधान परिषदेच्या जागांसाठी राज्यकर्ते दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विधान परिषद निवडणूकीच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले असून तिथे ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
”एकनाथ शिंदे हे आता अमित शहांच्या घरातील गेस्ट हाऊसमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना सारखं तिथे अमित शहांना भेटायला जावं लागतं त्यामुळे अमित शहांनी त्यांना पीजी म्हणून ठेवून घेतलंय. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, दुसरीकडे लोकं रस्त्यावर उतरलीयत, भ्रष्टाचाराचा डोंगर झालाय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीवर जाऊन गृहमंत्र्यांच्या लॉनवर गवतावर बसतायत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्राची लाज काढतायत तुम्ही. विधान परिषदेची एक जागा वगैरे हेच काम आहे का या महाराष्ट्रात? राज्यकर्त्यांनी या कठीण परिस्थितीत जागेवर राहिलं पाहिजे. दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला पाहिजे. दुष्काळी तालुक्यांची फक्त यादी जाहीर करून विधान परिषदेच्या जागांसाठी दिल्लीला फिरताय हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा राज्यकर्त्यांचे अमानुष वर्तन आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.































































