“तुमचा हा निर्णय मी कधी विसरणार नाही”, नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donald trump claims saving 35 million lives in india pakistan operation sindoor | saamana

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे लाजिरवाणे आणि अपमानास्पद असल्याचे ट्रम्प म्हणाले. इतकेच नाही तर नोबेल शांतता पुरस्काराबाबत नॉर्वेने घेतलेला हा निर्णय आपण कधीही विसरणार नसल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला. आपल्या राजनैतिक प्रयत्नांकडे आणि जगभरातील विविध युद्ध संपवण्यासाठी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली.

हिंदुस्थानी वंशाच्या नावी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरही ट्रम्प यांनी टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पुरस्कारासाठी निवड झालेली व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले. तसेच शांततेसाठी आपण केलेल्या प्रयत्नांचा विचार न करता दुसऱ्या व्यक्तीची निवड करण्यात आल्याचेही ट्रम्प म्हणाले.

हिंदुस्थानी वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचे नोबेल, डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हुलकावणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जगातील विविध देशांमधील संघर्ष थांबवण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही त्यांनी आपण आठ युद्धे आणि संघर्ष सोडवण्यासाठी प्रयत्न केले असून त्यासाठी आपल्याला एक नव्हे, तर आठ नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवे होते, असे म्हटले. गाझा आणि इराणशी संबंधित संघर्षांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

ट्रम्प यांच्या मते त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आखातातील तणाव कमी होण्यास मदत झाली. इराणला मध्यपूर्वेसह युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणण्यापासून रोखल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, इराणशी संबंधित तणाव आणि युद्धविरामाच्या प्रयत्नांबाबत ठोस प्रगती झाली आहे का, यावरून त्यांच्या दाव्यांची चर्चा सुरू आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी आपण मदत केल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याशिवाय रवांडा आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, थायलंड आणि कंबोडिया, आर्मेनिया आणि अझरबैजान, इजिप्त आणि इथिओपिया तसेच सर्बिया आणि कोसोव्हो यांच्यातील वादांचाही त्यांनी उल्लेख केला. या विविध देशांमधील संघर्ष आणि तणाव कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे सांगत ट्रम्प यांनी आपल्या कामगिरीचे समर्थन केले.