इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा स्फोट, हैदराबाद येथे इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱया इंडिगोच्या विमानात हजारो फुट उंचीवर अचानक एका प्रवाशाकडील पॉवर बँकचा स्फोट झाला. त्यामुळे विमानात आग लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ विमानाचे हैदराबाद येथे इमर्जन्सी लँडिंग केले.

इंडिगोकडून दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड बॅगेज ठेवण्याच्या जागेवर एका प्रवाशाच्या बॅगमध्ये पॉवर बँकचा स्फोट झाला. त्यामुळे या भागात आग लागली. प्रवाशांनी आग लागल्यानंतर आरडाओरड केली. विमानात आग लागल्याचा प्रकार लक्षात येताच चालकदलाने तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

वैमानिकाने विमान हैदराबादच्या दिशेने वळवले आणि हैदराबाद येथे विमान उतरवण्यात आले. चेन्नईला जाण्यासाठी प्रवाशांची दुसऱ्या विमानात सोय करण्यात आली. या विमानात 180 प्रवासी व चालकदलाचे सदस्य होते. आग लागण्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी मे महिन्यातदेखील इंडिगोच्या हैदराबाद-चंडीगड विमानात पॉवर बँकचा स्फोट झाला होता. या घटनेत पाच प्रवासी जखमी झाले होते.