पुण्याचे दोन्ही संघ सुस्साट, जोरदार विजयासह दोन्ही गटांत गाठली उपांत्य फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जबरदस्त बंदिस्त डोम आणि अप्रतिम आयोजनामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्राचे लक्ष वेधत असलेल्या 53 व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत पुण्याच्या दोन्ही संघांनी अफलातून खेळ करत उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली. आता त्यांची कुमारी गटात मुंबई उपनगरची झुंज होईल तर कुमार गटात त्यांच्यासमोर ठाण्याचे आव्हान असेल. त्याचप्रमाणे कुमारी गटात दुसरा उपांत्य सामना यजमान पालघर आणि सांगली यांच्यात रंगेल आणि कुमार गटात अहिल्यानगर आणि परभणी भिडतील.

वसई-विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने थरारक झाले. स्पर्धेत जोरदार खेळ करत प्रतिस्पर्धांना घाम फोडणार्या पुण्याच्या कुमार संघाने रायगडचे आव्हान 29-21 असे मोडीत काढले. दुसर्या लढतीत परभणीला रत्नागिरीला झुकवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. त्यांनी 45-33 अशा फरकाने उपांत्य फेरी गाठली. तिसऱया लढतीत ठाण्याने कोल्हापूरचा खेळ संपवला तर जालन्याने अहिल्यानगरचे आव्हान संपुष्टात आणत सर्वांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडले.

कुमारी गटात सांगलीने नाशिकला जबर धक्का दिला. मध्यंतराला 14-26 ने पिछाडीवर असलेल्या सांगलीने उत्तरार्धात वेगवान खेळ करत नाशिकच्या घशातून विजयाचा घास खेचला. त्यांच्या श्रावणी भोसलेने एकाच चढाईत 4 गुण मिळवत पूर्ण सामनाच फिरवला. या गुणांमुळे सांगलीने पिछाडी भरली आणि सामन्यावरही वर्चस्व मिळवले. सांगलीने 40-35 असा विजय मिळवला. मात्र पुण्याच्या मुलींनी जालनाची घोडदौड 31-16 अशी सहज रोखली, तर मुंबई उपनगरने अहिल्यानगरला धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळवले, तर यजमान पालघरने पुन्हा एकदा उपांत्य फेरीत प्रवेश करताना कोल्हापूरवर मात केली.