
देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना भेटण्यास सक्त नकार दिला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज, 12 ऑक्टोबर 2026 रोजी सरन्यायाधीशांची भेट घेऊन निवडणूक गैरव्यवहार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासंदर्भात निवेदन देण्याची वेळ मागितली होती. त्यांनी वेळही दिली. मात्र, ऐनवेळी ही भेट नाकारण्यात आल्यामुळे विरोधकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकारणावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देश सैतानांच्या हातात गेला आहे, म्हणूनच आम्ही तुमच्या दरबारात न्याय मागण्यासाठी येऊ इच्छित होतो, पण तुम्हीही आमचे दरवाजे बंद केले आहेत. देशाच्या इतिहासात याची नोंद होईल की, जेव्हा देश मोठ्या संकटात होता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जनतेसाठी आपले दरवाजे बंद केले होते. अशा शब्दांत संजय राऊत यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
‘आम्हाला राजकीय नेत्यांना भेटण्याचा अधिकार नाही,’ असे सांगत सरन्यायाधीशांनी भेट नाकारली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या देशातील जनतेने न्याय मागण्यासाठी जायचे कोणाकडे, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित केला. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आम्ही सातत्याने सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत, मात्र ती याचिका फेटाळण्यात आली. ईव्हीएममधील घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आमचे ऐकायला तयार नाही. पश्चिम बंगालमधील 29 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यासंदर्भातील याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहेत. मात्र, अशा प्रकारच्या सर्वच महत्त्वाच्या याचिका शेवटपर्यंत प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सरन्यायाधीशांनी, ‘मला विरोधी पक्षनेत्यांना आणि शिष्टमंडळाला भेटण्याचा अधिकार नाही, राजकीय लोकांना मी भेटू शकत नाही’, असे सांगत भेट रद्द केली. या भूमिकेवर देशातील जनतेने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे जवळपास 60 ते 70 न्यायाधीश राजकीय नेत्यांसोबत लंडनमध्ये बॅडमिंटन खेळतानाचे छायाचित्र समोर आले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. अनेक राज्यांमध्ये भाजपच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये न्यायाधीश हजर राहतात, उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री डिनरचे आयोजन करतात आणि न्यायाधीश तिथे आवर्जून उपस्थित राहतात, असा टोला त्यांनी संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही काही घरच्या लग्नाला किंवा गणपतीच्या आरतीला बोलावण्यासाठी आलो नव्हतो. जसे पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते, तसे आम्ही वैयक्तिक कारणासाठी आलो नव्हतो. देशात अघोषित तानाशाही सुरू आहे, आम्ही संविधानाचा आणि लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याबद्दल आणि होत असलेल्या मतचोरीविरोधात आपल्या दरबारात गाऱ्हाणे मांडण्यासाठी येत होतो. मात्र सरन्यायाधिशांनी सुनावणीचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत, म्हणूनच देश वाचवण्यासाठी आम्हाला सरन्यायाधीशांची भेट घ्यायची होती, पण तुम्हीही आमचे दरवाजे बंद केले आहेत. देशाच्या इतिहासात याची नोंद होईल की, जेव्हा देश मोठ्या संकटात होता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने जनतेसाठी आपले दरवाजे बंद केले होते, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने आमचे दरवाजे 24 तास खुले असतात, असे काल म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, जर दरवाजे खरोखरच खुले असतील, तर आम्ही सर्वजण येत आहोत, आमची बाजू ऐकून घ्या आणि एक दिवस ‘जनता न्यायालय’ भरवा, असे आव्हान संजय राऊत यांनी केले. देश, लोकशाही आणि संविधानासाठी असलेल्या या न्यायालयात केवळ 24 मिनिटांसाठी का होईना, पण दरवाजे उघडावेत, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ देत देशभरात सध्या एकाच प्रकारचा माहोल तयार झाल्याचे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवाजी पार्कवर एक आंदोलन पुकारण्यात आले आहे. ‘हिंमत असेल तर हे आंदोलन रोखून दाखवा’, असे खुले आव्हान सत्ताधाऱ्यांना संजय राऊच यांनी यावेळी दिले. पुढे ते म्हणाले, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण सैन्य आणि यंत्रणा आपल्या संरक्षणासाठी बसवली आहे, आणि केवळ त्याच बळावर त्यांचे पंतप्रधानपद आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहमंत्रीपद टिकून आहे. मात्र, तेही लवकर पायउतार होतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.


























































