
Ranji Trophy 2026 च्या मोसमात मुंबईविरुद्ध चंदीगड सामन्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने धडकी भरवणारी गोलंदाजी केली आहे. एलिड ग्रुप-डी च्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 429 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात चंदीगडच्या फलंदाजांवर तुषार देशपांडे हावी झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने हॅट्रीकसह पाच फलंदाजांचा तंबुचा रस्ता दाखवला आणि चंदीगडे 8 फलंदाज 100 धावांच्या आता बाद झाले.
मुंबईचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाल्यानंतर मुशीर खान (65), सिद्धेश लाड (86), तनुष कोटियन (58) आणि मोहित अवस्थी (56) यांनी अर्धशतके ठोकत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मुंबईने उभ्या केलेल्या 429 धावांच्या डोंगराला फोडण्यासाठी उतरलेल्या चंदीगडच्या फलंदाजांना तुषार देशपांडेने मैदानात टिकू दिले नाही. त्याने 11 व्या षटकात तुषारने सलग तीन चेंडूंमध्ये तीन बळी घेत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. तर 7 षटकांत 17 धावा देत चंदीगडच्या 5 फलंदाजांना आल्यापावली माघारी धाडलं.
तुषार देशपांडेच्या धारधार गोलंदाजीमुळे चंदीगडचा संपूर्ण संघ 78 धावांमध्ये बाद झाला असून चंदीगडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. दुसऱ्या डावातही तुषार देशपांडेने चंदीगडला पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा हादरा दिला. विषू कश्यप भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यामुळे चंदीगडची अवस्था नाजूक असून मुंबईकडे अजूनही 351 धावांची भक्कम आघाडी आहे.





























































