
जिह्यातील अहेरी नगरपंचायतीतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना 1 लाख 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गोंदिया पथकाने रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. नगरोत्थान योजनेतील विद्युत कामांची बिले मिळाल्यानंतर ठेकेदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून कंत्राटदाराच्या बिलाच्या 15 टक्के रकमेची, म्हणजेच 3 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यापैकी 1 लाख 20 हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. गुडेल्लीवार हे माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवशीच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
‘कामे आणली; 15 टक्के द्या!’
विभागाच्या अहवालानुसार, तक्रारदार हे 33 वर्षीय परवानाधारक इलेक्ट्रिकल ठेकेदार असून अहेरी येथे त्यांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान आहे. त्यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना सन 2025-26 अंतर्गत अहेरीतील प्रभाग क्रमांक 1 ते 10 आणि प्रभाग क्रमांक 11 ते 17मध्ये अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याची कामे मिळाली होती. या दोन्ही कामांची एकूण मंजूर निविदा रक्कम 19 लाख 87 हजार 765 रुपये होती.



























































