मुंबईसह राज्याची सागरी सुरक्षा तगडी होणार; लवकरच पोलीस दलात हॉवरक्राफ्ट, जेट्स स्की, ड्रोन दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे 

मुंबई दहशतवाद्यांच्या सदैव टार्गेटवर असते. मुंबापुरीत शस्त्रात्र तसेच दहशतवादी घुसण्याकरिता समुद्र मार्गाचा वापर करतात. त्यामुळे मुंबईसह राज्याची सागरी सुरक्षा सक्षम व तगडी असणे काळाजी गरज आहे. हीच गरज ओळखून पोलीस दलात लवकरच हॉवरक्राफ्ट, 28 मीटरची बोट, जेट्स की, ड्रोन दाखल होणार असून या यंत्रणा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय 13 फ्लोटिंग जेट्टीदेखील उभारण्यात येणार आहेत.

‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मुंबईच्या संवेदनशील किनाऱयासह महाराष्ट्राच्या सागरी किनाऱयाला तगडी सुरक्षेचे कवच लाभणार आहे. कारण आता मुंबई पोलिसांसह राज्य पोलीस दलात दोन हावरक्राफ्ट बोट, एक अत्याधुनिक बोट, 23 ड्रोन व 21 जेट्स की दाखल होणार आहेत. या यंत्रणा घेण्यासाठी मंजुरी मिळाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात येते. हावरक्राफ्टमुळे पोलिसांना कुठल्याही ठिकाणी झटपट पोहचणे सहज शक्य होणार आहे.

लंडनहून येणार हावरक्राफ्ट

सद्यस्थितीत दोन हावरक्राफ्ट बोटी मुंबई पोलिसांसाठी मंजूर झाल्या आहेत. लंडन येथून या बोटी घेण्यात येणार आहे. बोटी घेण्यास मंजुरी तर मिळाली आहे. त्या आल्या की लगेच पोलीस दलात सामील होतील असेही ते अधिकारी म्हणाले.

अशी असेल व्यवस्था

गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन म्हणजेच तरंगती जेट्टी उभारली आहे. त्या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या चार बोटी कायमस्वरूपी 24 तास तैनात ठेवण्यात येणार. त्यामुळे तेथून कुलाबा तसेच वरळीपर्यंत गस्त घालणे सोयीचे होणार आहे.

लवकरच बोट स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू होईल

पश्चिम सागरी किनाऱयावर पोलिसांची तगडी गस्त असणे गरजेचे आहे. या सागरी किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर बोट स्टेशन उभारण्यात आले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ही जेट्टी मुंबई पोलिसांना सुपूर्द केली जाईल असे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.