सह्याद्री प्रकल्पात आणखी ३० वाघांना पोषक अधिवास, हिरकणी, तारा, चंदाच्या आगमनाने आशादायी चित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या सुमारे दहा वाघांचा अधिवास असून, आणखी ३० वाघांना सामावून घेण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. घनदाट जंगले, मुबलक जलस्रोत आणि समृद्ध जैवविविधता यामुळे सह्याद्रीचा परिसर वाघांच्या अधिवासासाठी पोषक ठरत आहे. तारा, चंदा आणि हिरकणी या वाघिणींच्या आगमनामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने आशादायी वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र सुमारे १,१६६ चौरस किलोमीटर आहे. या परिसरात सुमारे १८ नद्यांची उगमस्थाने असून, घनदाट अरण्ये आणि मुबलक पाण्यामुळे वन्यजीवांना अनुकूल वातावरण मिळते. वाघांसह बिबट्या, रानकुत्रे, अस्वल, गवा, सांबर आणि चितळ अशा विविध वन्यजीवांचे अस्तित्व या जंगलाची समृद्धता अधोरेखित करते. एकेकाळी सह्याद्रीच्या जंगलात वाघांचे अस्तित्व होते. मात्र, अनियंत्रित शिकारीमुळे त्यांच्या संख्येत घट झाली. वनसंवर्धन, शिकारीला प्रतिबंध आणि अधिवासाच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाघांच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. २०२३-२४ मध्ये सेनापती, सुभेदार आणि बाजी हे वाघ प्रकल्पात स्थिरावल्यानंतर वाघांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघिणी आणण्याच्या मोहिमेअंतर्गत प्रथम तारा, त्यानंतर चंदा आणि हिरकणी यांचे सह्याद्रीत आगमन झाले. या वाघिणींच्या प्रजननातून बछड्यांचा जन्म झाल्यास सह्याद्रीतील वाघांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पातील वाघांच्या पुनर्वसन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे. प्रकल्पातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण, वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यांची सांगड घातल्यास वाघांच्या पुनरागमनाला दीर्घकालीन बळ मिळू शकते.

पर्यटनातून जनजागृतीला चालना

कराड बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती देणारे फलक व वाघांची छायाचित्रे लावल्यास या जंगलाची ओळख अधिक व्यापक होऊ शकते. त्यातून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती आणि निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.