स्वप्न सत्यात उतरलं… आता कारही हवेत उडणार! टेस्लाने शेअर केला ‘रोडस्टर’चा थरारक व्हिडीओ; एका सेकंदात 100 किमी वेगाने जग थक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्पनेला वास्तवात उतरवत अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीने हवेत उडणारी कार बनवून दाखवली आहे. टेस्लाने आपल्या एक्स अकाऊंटवरून ‘टेस्ला रोडस्टर’ या कारचा हवेत झेपावतानाचा आणि सुरक्षित लँडिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. रॉकेटच्या उड्डाणासाठी वापरले जाणारे ‘कोल्ड गॅस थ्रस्टर्स’ या कारमध्ये बसवण्यात आले आहे. ही कार 1 सेकंदामध्ये 0 ते 96 किमी प्रति तास एवढा प्रचंड वेग पकडू शकते असा दावाही करण्यात आला आहे. टेस्लाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून जग थक्क झाले असून आता कार चालवण्याचे नाही तर उडवण्याचे दिवस आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

टेस्लाने बहुप्रतिक्षित ‘रोडस्टर 2.0’ हायपर कार नुकतीच टेक्सास येथे एका शानदार कार्यक्रमात जगासमोर आणली. 2017 मधील प्रोटोटाइपच्या घोषणेनंतर तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही कार लाँच करण्यात आली आहे. स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ही कार जेम्स बाँडच्या चित्रपटातील वाहनापेक्षाही भारी असल्याचा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे.

या नवीन रोडस्टरमध्ये तीन अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये हवेच्या दबावामुळे कारला ट्रॅकवर घट्ट चिकटवून ठेवणारी ‘मल्टी-मोड सक्शन सिस्टीम’, रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित ‘ॲक्सिलेरेशन थ्रस्टर’ आणि कारला हवेत नियंत्रण ठेवून सुरक्षित उड्डाण करण्यास मदत करणारी ‘फुल फ्लाईट सिस्टीम’ यांचा समावेश आहे. यातील थ्रस्टर्समुळे कार अवघ्या 0.81 सेकंदात ताशी 96 किमी वेग पकडू शकते.

परफॉर्मन्स, थ्रस्ट आणि रॉकेट अशा तीन आकर्षक ट्रिम्समध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. सुरक्षेचा विचार करून सध्या याचे नियंत्रण रोबोट डमीच्या हातात देण्यात आले होते. या कारची बाजारात 2028 मध्ये अधिकृत विक्री सुरू होणे अपेक्षित असून, सध्या 5000 डॉलर भरून बुकिंग करता येईल.

मस्क यांच्या दाव्यानुसार, भविष्यात मॅन्युअल चालवली जाणारी ही टेस्लाची एकमेव कार असेल. तसेच, आगामी काळात ही कार स्नेक रिव्हर कॅनियन ओलांडण्याचा थरारक विक्रम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.