मोबाईल चोरट्यांचा प्रतिकार करताना 22 वर्षीय तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू

चेन्नईमध्ये मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरूषांचा प्रतिकार करत असताना लोकल ट्रेनमधून तोल जाऊन पडल्याने एका 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. सदर घटना 2 जुलै रोजी चैन्नईमधील इंदिरा नगर एमआरटीएस रेल्वे स्थानकात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस प्रीती असे मृत तरूणीचे नाव असून, कोट्टरपुरमहून येथील रहिवासी होती. थिरुवनमियुर येथील एका खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होती. प्रीती ट्रेनच्या दरवाजावर फोनवर बोलत उभी होती. दोन चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात प्रीतीचा तोल जाऊन ती फलाटावर पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जागीच बेशुद्ध झाली. लोकांनी प्रसंगावधान दाखवत तिला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र (8 जुलै) शनिवारी प्रकृती गंभीर झाल्याने प्रीतीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांना मोबाईल चोरणाऱ्या दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले आहे, तसेच मणिमारन आणि विघ्नेश यांनी केलेल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.