प्रसूतीसाठी ओंडक्यावरून गर्भवतीचा नदीपल्याड प्रवास

नदीवर पूल नसल्याने प्रसूती वेदना सुरू झालेल्या गर्भवतीला चक्क ओंडक्यावर बसून दुथडी भरून वाहणाऱया नदीतून रुग्णालय गाठावे लागल्याची धक्कादायक घटना मोखाडय़ात समोर आली आहे. धडकी भरवणारा हा प्रवास करत नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गाठणारी सुरेखा भागडे (24) हिची प्रकृती स्थिर असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. 

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम कुर्लोद ग्रामपंचायतीमधील शेडय़ाचा पाडा येथील सुरेखा भागडे या गर्भवतीला आज अचानक सकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्या. सुरेखा सात महिन्यांची गर्भवती आहे. तिला जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी गारगई नदी पार करावी लागणार होती. या नदीवर पूल नाही. मोखाडय़ात मुसळधार पावसामुळे गारगई नदीला पूर आला असल्याने सुरेखाला नदी पार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी लाकडी ओंडक्याचा आधार घेतला.