50 खोके आणि गुवाहाटी, सुरतचा खर्च कोणी केला ? आदित्य ठाकरेंचा मिंधे गटाला खणखणीत सवाल

इंडिया आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत किती पैसा खर्च केला असा प्रश्न विचारणाऱ्या मिंधे गटाच्या नेत्यांना युवासेनाप्रमुख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी खणखणीत सवाल विचारला आहे. हा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी गुवाहाटी, सुरत, चार्टर्ड प्लेनचा खर्च आणि विशेष म्हणजे 50 खोक्यांचा खर्च कोणी केला हे सांगावं असं आव्हान दिलं आहे. मिंध्यांच्या दसऱ्याला झालेल्या सभेसाठी एसटीला 10 कोटी रुपये दिले होते. हे पैसे कुठून आले ? तो सरकारी खर्च होता का कोणाच्या खिशातून आला होता ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे मुंबईतील ग्रँड हयातमध्ये पोहोचले असून त्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.